मंडळाच्या करोना फायटर्स नी 44 तरुणांची केली मदत

आज देश भीषण अशा कोविड-१९ च्या मगरमिठीमध्ये स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहे. अशाच संकटसमयी खऱ्या अर्थाने आपण आपल्यातील माणुसकी जोपासण्याची गरज आहे. आपण आपल्या लहानसहान कृती/सेवे मधूनच दयाशीलता/माणुसकीचा धर्म कृतीत आणण्याचा प्रयत्न करू शकतो, नव्हे तो करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपण आपल्या देशबांधवांप्रतीचे उत्तरदायीत्व निभावू शकू.

या संकटकाळात शक्य तेवढ्या गरजूंना अन्नधान्य पुरवून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा या मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन विवेकानंद सेवा मंडळ,डोंबिवली या स्थानबद्धतेच्या काळात पुढे सरसावले आहेत.

३ मे पर्यंत वाढविण्यात आलेल्या या लॉकडाऊनचा फटका कल्याण येथे ४४ आय.टी.आय. कोर्स शिकणारे विद्यार्थ्यांना बसला. विदर्भातील अनेक खेड्यांमधून आय.टी.आय internship/apprenticeship साठी आलेल्या आणि कल्याण येथील "वसार" येथे एका चाळीत राहणाऱ्या या विद्यार्थ्यांची गेल्या २ दिवसांपासून खाण्याअभावी उपासमार होत असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कल्याण येथील एका स्वयंसेवकाकरवी निदर्शनास आले.

दोन दिवसांपासून उपाशी असलेल्या त्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची तात्काळ सोय संघाच्या कल्याण येथील स्वयंसेवकांनी केली आणि त्या विद्यार्थ्यांच्या समस्यांची पूर्ण कल्पना आल्यानंतर विवेकानंद सेवा मंडळाशी संपर्क साधून त्या विद्यार्थ्यांच्या पुढील खाण्याची/ अन्नधान्याची/ किरणाची सोय करण्याबाबत विचारणा/ विनंती केली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिस्थितिचे गांभीर्य ओळखून त्या विद्यार्थ्यांना त्यांना महिन्याभरासाठी लागणाऱ्या सर्व सामानाची यादी करण्यास सांगितले.

यादी हाती पडताच पुढील प्रश्न होता तो या लॉकडाऊन काळात ४४ जणांना महिन्याभरासाठी पुरेल एवढा किराणा आणि इतर वस्तू जमा करून त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचा आणि त्यासाठी लागणारा निधी उभा करण्याचा.
पण म्हणतात ना इच्छा तेथे मार्ग...!

मंडळातील कार्यकर्त्यांनी आपल्या नातेवाईक, मित्रमंडळींमार्फत हा निधी उभा केलाच.

अगदी ३०० रुपयांपासून ते आपणांस शक्य तेवढे पैसे कार्यकर्त्यांनी जमवून त्या ४४ मुलांच्या १ महिन्याच्या किराणा सामानाची खरेदी करण्यात आली.

डोंबिवलीतील शाळेपासूनच्या मित्रांच्या एका ग्रुप ने निधी संकलनाची जबाबदारी उचलली. आणि अवघ्या १ दिवसात, किराणा खरेदी व्यवहाराचे सर्व सोपस्कार आटपून त्या ४४ मुलांच्या १ महिन्याच्या धान्य व किराणा सामानाची खरेदी करून टेम्पो मार्फत ते समान त्या मुलांपर्यंत पोहोचते करण्यात आले.

प्लेग, कॉलरा, स्वाईन फ्ल्यू सारखे जीवघेणे रोग एकीकडे आपल्या प्रगत आरोग्य सुविधांवर मात करून आपल्या आर्थिकरीत्या दुर्बल घटकांवर मृत्यूचे सावट गडद करत असताना, आपल्यातील माणुसकीची पदोपदी परीक्षा घेत असताना केवळ आपल्यातील प्रेम आणि सेवाभावच या आणि अशा अनेक संकटातून भारतीयांस तारू शकतो.


{{-- --}}